अमेरिकेतली अटलांटा येथील गुढीपाडवा शोभायात्रा
North Atlanta Dhol Tasha and Lezim ह्या शब्दातील पहिल्या अक्षरा पासून बनला एक नवीन शब्द NADTAL. अमेरिका देशात जॉर्जिया राष्ट्रात अटलांटा शहरात नादताल ही nonprofit registered संस्था आहे. ह्या संस्थेच्या नावातच आहे ते म्हणजे ढोल, ताशा आणि लेझिम या प्रामुख्याने भारतात वाजवण्यात येणा-या या वाद्यांच्या पथकांची संस्था. या नादताल संस्थेची निर्मिती झाली ती अमेरिकेत महाराष्ट्राची परंपरा, वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी आणि ह्या वाद्यांचे विनामूल्य शिक्षण, प्रशिक्षण, सराव आणि प्रदर्शन करण्यासाठी. तसेच लहान मोठयांच्या सुप्त कलागुणांना ह्या माध्यमातून प्रकट होण्यास वाव देण्यासाठी.
ही नादताल संस्था हौशी लोकांसाठी भारतातून अनेक ढोल, ताशे, लेझिम अमेरिकेत मागवून देते आणि अमेरिकेतले स्थानिक प्रशिक्षित आणि अनुभवी कलाकार शिक्षक आपले आर्थिक उत्पन्नाचे काम धंदे सांभाळून या वाद्य वादनाची आवड असलेल्यांना विनामूल्य शिक्षण देते. अनेक दिवसांच्या सरावा नंतर आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यास नवीन वादक कलाकार तयार होतात. आणि सराईत कलाकारांना नादताल संस्था शिवजयंती उत्सव, गणेश विसर्जन मिरवणूक, आषाढातील रथ यात्रा, भारतीय स्वातंत्र दिन सोहळा या आणि यासारख्या अनेक कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यास संधी उपलब्ध करून देते.
शनिवार, दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी नादताल संस्थेने कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील शोभायात्रेच्या धरतीवर गुढीपाडव्यानिमित्त सर्व कलाकारांसोबत अटलांटा शहराजवळील अल्फारेटा येथील चिन्मय गुरुकुल येथे शोभायात्रा आयोजित केली होती. ही शोभायात्रा अमेरिकेतील पहिली शोभायात्रा असल्यामुळे सर्वांना उत्साहाचे उधाण आले होते. या शोभायात्रेची तयारी साधारण तीन -चार महिने आधीच सुरवात झाली. दररोजच्या चर्चा, बैठका यातून नवनवीन कल्पना पुढे येत होत्या, त्याचा विचार विनिमय आणि एकमताने निर्णय होत होते. शोभायात्रेसाठी अनुरूप अशी जागा शोधून आरक्षण करणे, त्यासाठी पैसे उभे करणे यात्रेच्या मार्गाची रेखाटणी करणे, स्थानिक रहिवाशांना शोभायात्रा पाहण्यासाठी येण्याचे आमंत्रण देणे, रथयात्रेत ढोल, ताशा, आणि लेझिम यांच्या वादनाच्या प्रदर्शनाचा क्रम ठरवणे याशिवाय गुढी उभारण्याच्या सामानाची जमवा जमव , पूजनाची तयारी, सर्वांच्या खाण्यापिण्याच्या सोयी, कर पार्कींगची आखणी, फोटो बूथ, अचानक समोर ठाकणा-या समस्यांचे निराकरण, एकूण व्यवस्थापन आणि आयोजन ही आणि अशी अगणित कामे स्वयंसेवकांची फौज सामंजस्याने आणि एकत्रीतपणे एका मागून एक पार पाडत होती. अगदी आदल्या दिवशी ही महिला वर्ग चैत्रातील हळदी कुंकवाची तयारी, भिजलेली डाळ आणि कैरीचे पन्ह करण्यात गुंतली होती.
शनिवार, दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी कलाकार मंडळी आणि स्वयंसेवक चिन्मय गुरुकुल येथे जमली. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेच्या पदकांची गाठ बांधून त्यावर तांब्या बसवला गेला. एका जागी गुढी उभी करून आजूबाजूला सुरेख रांगोळी रेखाटली गेली आणि गुढी पूजनाची इतर तयारी करण्यात आली. रेस्टॉरंट व इतर वस्तूंच्या विक्रेत्यांसाठी टेबले मांडण्यात आली आणि शोभायात्रेची तयारी झपाट्याने पूर्ण करण्यात आली.
जसे आमंत्रित येत गेले तसतसे त्यांची नोंदणी करण्यात आली. चैत्र महिन्यातील हळदी कुंकवातील खासियत असलेले भिजलेली डाळ आणि कैरीचे पन्ह देण्यात आले. महिलांचे स्वागत हळदी कुंकु, फुले देऊन करण्यात आले. पारंपारिक वेशात नटून थाटून आलेल्यां सर्वांनी हा २०२४ चा गुढीपाडवा कायमचा लक्षात राहावा म्हणून सुंदर अशा तयार केलेल्या फोटो बूथ समोर अगणित फोटो काढले.सर्वप्रथम आमंत्रितांचे स्वागत झाले. सूचना दिल्यानंतर अटलांटातील पौरोहित्य शिकलेल्या मराठी गुरुजींच्या सांगण्यानुसार गुढीची साग्रसंगीत पूजा करण्यात आली. सर्वांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
वसंत ऋतूतील मराठी नववर्षाच्या स्वागताला सर्व परिसरच जणू उत्तेजित झाला होता. त्या सकाळी रवीराजांनी आपली किरणे जरा आटोपती घेतली होती त्यामुळे वातावरणात आल्हादायक असा गारवा होता. झाडांवर कोवळी पाने फुटत होती तर काहींवर फुलांचा बहर उमलत होता. छोटे रंगीत स्थानिक पक्षी मंजुळ अश्या किलबिलाटाच्या संगीताची साथ देत होते. सर्व वातावरणात आनंद ओसंडून वाहत होता.
ढोल, ताशा, लेझिम वादकां बरोबर झांज वादक ह यात्रेच्या मार्गावर सज्ज झाले. यात नऊवारी साड्या नेसून, कपाळावर चंद्रकोर रेखाटून नाकात नाथ, केसांचा अंबाडा घालून स्त्रिया, युवती आल्या होत्या. त्यांच्या सोबत रंगीत पारंपारिक झब्बा लेंगा घालून आणि डोक्यावर फेटा बांधून युवक, पुरुष आणि अनेक बाल कलाकार सामील झाले होते.
यात्रेत सर्वात पुढे शिवरायांचे चित्र असलेला मोठा केशरी ध्वज फडकत होता. त्याबरोबरच नादताल नाव झळकणारे गोलाकार चामर ही उंच झुलत होते. त्याच बरोबर सामाजिक संदेश देणाऱ्या पाट्याही होत्या. त्यानंतर काही लहान बाळ-गोपाळ पारंपारिक वेशात तर काही ऐतिहासिक नेत्यांच्या वेशात उभे राहिले. त्यानंतर लेझिम वादक, झांज, टोल वादक, महाराष्ट्राचे आवडते गुरू शेगावचे श्री गजानन महाराजांची सुशोभित पालखी, त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रक मध्ये मराठा राजा शिवाजी महाराज, माता जिजाई, आणि राणी सई बाईंच्या वेशातील कलाकार आणि त्यानंतर पारंपारिक वेशातील इतर कलाकार असा शोभायात्रेत क्रम होता.
शंख नाद करून यात्रेची सुरुवात झाली. प्रेक्षकांचे कॅमेरे सरसावले आणि एक अन एक क्षण टिपले जाऊ लागले. टोल टणटणला. इंद्र जिमि जृंभपर
हे शिवरायांचे गुणगान खड्या आवाजात आसमंतात दुमदुमले. केशरी ध्वज आणि चामर उंचावले. झांज घणघणले. ताशे कडाडले. प्रत्येक ढोलांवर कडक रांगडी थाप पडली आणि ढोल गर्जले. त्याच ठेक्यावर लेझिम खेळाचे प्रात्यक्षिक खळाळले आणि या स्फूर्तीदायक आवाजात शोभा यात्रा सुरू झाली.
शोभायात्रेतील वादक कलाकार आतमविश्वासाने आपल्या कलेचे जल्लोष पूर्ण प्रदर्शन करत होते. या ऊर्जेत ढोल ताशाच्या ठेक्याची नशा चढली आणि ढोलताशांच्या गजरात आबालवृद्ध प्रेक्षकही जोशात नाचत नाचत यात्रेत सामील झाले. सूर्य डोक्यावर येऊन ठेपल्यावरही भर उन्हात संगीत आणि नाच बेभानपणे सुरू राहिले. यात्रेची सांगता सर्वांचा एकत्रित फोटो घेऊन झाली. जेवण खाण करून सर्व मंडळी साफसफाईला जुंपली. सर्व काम सहयोगाने पूर्ण करून घरी परतताना सर्वांच्या चेह -यावर आनंद होता. कार्यक्रमाची वाह वाह होती. काहींनी चुका दर्शवून आणि कमतरता निदर्शनास आणून उपयुक्त सूचना केल्या. आलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांमधून नादतालला पुढील कार्यक्रमासठी नवीन संकल्पना मिळाल्या. पुढील वर्षी शोभायात्रा अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असा आत्मविश्वास नादताल मधील प्रत्येक सदस्याला वाटला.
एकूण अभिप्राय सर्वांना कार्यक्रम आवडला असा होता. संस्कृती रसिक अश्या चोखंदळ स्वयंसेवकांच्या योगदानामुळे, मेहनतीमुळे आणि सुसंवादाने केलेल्या सहकार्यामुळेच शोभायात्रा अतिशय सुंदर पार पडली. इंटरनेट आणि फेसबुक, युट्युब, वॉटस्अँप सारख्या सोशल मिडियामुळे नादताल या संस्थेला केवळ अमेरिकतच नाही तर जगभरात प्रसिद्धीची एक वेगळीच झालर आणि वलय प्राप्त झाले आहे. ह्या शोभायात्रे मुळे पारंपारिक ढोल-ताशा, लेझिम वादनाच्या कलेला अटलांटामधे अधिक प्रोत्साहन मिळाले. याशिवाय अमेरिकेत महाराष्ट्राच्या संस्क्रुतीचा प्रचार आणी प्रसार तर झालाच आणि अमेरिकेत वाढलेल्या पुढच्या पिढीला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ठेवा मिळाला.
मीनल गद्रे. जॉर्जिया, अमेरिका.